जीवनचरित्र
15 जून 1938 रोजी अहमदनगर जवळ भिंगार या गावी माझा जन्म झाला, गाव राळेगण सिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर असले तरी आजोबा (वडिलांचे वडील) इंग्रज सैन्यात भिंगार कॅम्पमध्ये जमादार पदावर नोकरी करीत असल्यामुळे आमचा परिवार भिंगारलाच रहायला असायचा. त्यामुळे माझा जन्म भिंगारलाच मिलिटरी कॅम्पमध्ये झाला. भिंगार येथील कै. खुशरू इराणी ब्रदर्स या शाळेत माझे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण झाले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मामा मला मुंबईला घेऊन गेले. लहान वयात आईचे माझ्यावर चांगले संस्कार झाले होते. आई शिकलेली नव्हती पण मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाने आपल्या आयुष्यात कसे वागावे हे तिला चांगले कळले होते. खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, लबाडी करू नये, नेहमी लोकांचे भले करण्याचा प्रयत्न करावा, नाही भलं करता आले तर कोणाचेही वाईट तरी करू नये या संस्कारांचा माझ्या जीवनावर खुप प्रभाव पडत गेला.
लहान वयापासूनच जीवनात आईच्या संस्कारामुळे राष्ट्रप्रेम निर्माण झाले होते. म्हणून मी 1963 साली सैन्यामध्ये भरती झालो. माणसं का जगतात ? या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नव्हते. मी अनेकांना हा प्रश्न विचारीत राहिलो, पण उत्तर मिळत नाही म्हणून मी एक दिवस एकांतपणे बसून ठरविले की आत्महत्या करून जीवन संपवून टाकायचे. योगायोग असा की दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरील बुक स्टॉलवर एका छोटाशा पुस्तकावरील स्वामी विवेकानंद यांचे चित्र आकर्षक वाटले म्हणून मी ते एक पुस्तक विकत घेतले. वाचायला सुरूवात केली आणि जीवनाचा धागा हाताशी आला. स्वामी विवेकानंद यांची आणखी पुस्तके वाचत गेलो. स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण विचार समजणे सोपे नाही. माझ्या सारख्या अल्पशिक्षित माणसाला तर शक्यच नाही. पण स्वामी विवेकानंदांच्या विचारातून मला एक गोष्ट समजली की प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझे माझे म्हणत पळतो आहे. कारण तो आनंदाच्या शोधात लागला आहे. विवेकानंद म्हणतात अखंड आनंद बाहेरून मिळणार नाही तर अखंड आनंद आपल्या आतूनच मिळत असतो. जे दुःखी पीडित लोक आहेत, रंजले गांजलेले लोक आहेत अशा माणसांची सेवा हीच खरी ईश्वराची पूजा आहे. अशा पूजेमधून अखंड आनंद माणसाला मिळत असतो. मात्र अशी सेवा निष्काम भावनेने करावी. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा माझ्या जीवनावर झालेला प्रभाव आणि महात्मा गांधीजींच्या ‘ खेड्यांकडे चला ‘ या विचारांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यामुळे वयाच्या 25 व्या वर्षी भर तारूण्यातच मी माझ्या संपूर्ण जीवनाचे ध्येय ठरविले की आता जीवनात गावाची, समाजाची, देशाची सेवा निष्काम भावनेने करायची. सेवेचा अर्थ फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेले कर्म. ‘ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ‘ संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित केले. Read More
पुरस्कार
आंदोलन
१९८०
राळेगण सिद्धी गावात शाळा मान्यतेसाठी आंदोलन
१९८३
प्रशासकीय असहकाराच्या विरोधात आंदोलन
१९८९
शेतीसाठी ठिबक सिंचन अनुदानासाठी आंदोलन
१९८९
शेतकऱ्यांना विजेच्या सुविधांसाठी आंदोलन
१९९४
महाराष्ट्र वनविभागातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन
गॅलरी
अनुभवाचे बोल
” जे शिक्षण सामाजिक बांधिलकी असलेला माणूस घडवत नाही, ते निरुपयोगी आहे “
– स्वामी विवेकानंद